Advertisement

बाळासाहेब थोरातांनी विखेंवर डागली तोफ ; ‘तालुक्याला त्रास देणाऱ्यांना माफी नाही’

Ahilyanagar Vidhan Sabha Election 2024 : धांदरफळ येथील घटना दुर्दैवी असून, महिलांचा अपमान होत असताना जनतेसमोर तुम्ही टाळ्या वाजवल्या. या घटनेला तुम्ही जबाबदार आहे.

संगमनेर : धांदरफळ येथील घटना दुर्दैवी असून, महिलांचा अपमान होत असताना जनतेसमोर तुम्ही टाळ्या वाजवल्या. या घटनेला तुम्ही जबाबदार आहे. मागील अडीच वर्षांत तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस करून त्रास दिला. तालुक्याला त्रास देणाऱ्यांना माफी नाही, असे सांगताना दहशतवादी प्रवृत्ती रोखण्यासाठी उमेदवार कोण? हे न पाहता त्याच्या मागची प्रवृत्ती पराभूत करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करा, असे आवाहन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.

जाणता राजा मैदानावर काँग्रेस व महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सभा आयोजित केली. यावेळी व्यासपीठावर खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार मोहन जोशी, जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, डॉ. जयश्री थोरात, शिवसेनेचे रावसाहेब खेवरे, बाळासाहेब गायकवाड, दुर्गा तांबे, संजय फड, दिलीप साळगट, कैलास वाकचौरे, अशोक सातपुते आदींसह महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार थोरात म्हणाले, अडीच वर्षांपूर्वी राज्यात तोडाफोडी करून आलेले बेकायदेशीर सरकार, त्यानंतर राज्यात बिघडलेली कायदा-सुव्यवस्था, महिलांवरील अत्याचार, हिट अँड रन, असे सगळे प्रकार दुर्दैवी आहेत. मागील अडीच वर्षांपासून तालुक्यात सत्ताधाऱ्यांनी अनेकांना त्रास दिला. नागरिकांवर खोट्या केसेस टाकल्या. तालुक्यात एक हजार कोटींचे दंड झाले. राज्यातील वाळूचे धोरण पूर्णपणे फसले आहे. वाळूमाफिया मोठे केले आहेत.

निळवंडे धरण आम्ही केले, त्यामध्ये तुमचा वाटा काय, तुम्ही अडथळे निर्माण करण्याचे प्रयत्न केले. धरण आणि कालवे आम्ही पूर्ण केले. फक्त पाणी तुम्ही सोडले. ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांना धरणावर बोलवले नाही. संगमनेर आणि राहाता तालुक्याची तुलना कराच खुल्या चर्चेला मी तयार आहे. तालुक्याचा विकास आपल्याला पुढे न्यायचा असून, वाईट प्रवृत्ती रोखण्याकरिता खबऱ्यांचा चेहरा जरी उमेदवार म्हणून असला, तरी या मागच्या प्रवृत्तीला पराभूत करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करा, असे आवाहन त्यांनी केले.

सभा तालुक्याच्या स्वाभिमानाची ऐतिहासिक सभा आहे. आमदार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका विकासाचे मॉडेल बनला आहे. याउलट चालू असलेल्या संस्था बंद कशा करायच्या हे प्रवरेचे मॉडेल आहे. त्यांना पराभव पचवता आला नाही, नैराश्यातून काहीही बोलत आहेत. २००७ ला जिल्हा परिषद अध्यक्ष आमच्याकडे संख्या जास्त असूनही तुम्ही होऊ दिले नाही. सगळी पदे तुमच्या घरामध्ये आहेत. धांदरफळची घटना ही अत्यंत दुर्दैवी असून जे मिटवायला गेले त्यांच्यावर हाफ मर्डरच्या केसेस टाकल्या. हा प्रशासनाचा कोणता कारभार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *